नॅचरल शुगरच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ; २५ टक्के बोनस

कळंब : तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ आणि दिवाळीनिमित्त २५ टक्के बोनस देण्याची घोषणा चेअरमन बी. बी. ठोंबरे यांनी केली. पगारवाढ १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नॅचरल उद्योग समूहाने शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. साखर उद्योगात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक बोनस देण्याची परंपरा कायम ठेवत यंदाही २५ टक्के बोनस देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या शिफारशीनुसार कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ लागू केली जाणार आहे. वेतनवाढ आणि बोनसच्या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामगार संघटनेच्या वतीने चेअरमन बी. बी. ठोंबरे यांचा सत्कार करून या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.






