विजेची तार तुटल्याने साडेनऊ एकर ऊस खाक; २२ लाखांपर्यंत नुकसान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शिरूर : पिंपळसुटी (ता. शिरूर) येथे मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून शेतात पडल्याने लागलेल्या आगीत चार शेतकऱ्यांचा सुमारे साडेनऊ एकर ऊस जळून खाक झाला. रविवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. ऊस पिकासह पाइपलाइन आणि ठिबक सिंचन संचाचे मिळून सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सुनील बाळासाहेब फराटे यांच्या ऊसाच्या शेतात विद्युत वाहिनीची तार तुटून पडल्याने आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आगीने वेगाने रौद्ररूप धारण केले आणि जवळच्या शेतांमध्येही ती पसरली. यात लक्ष्मण रामसाहेब फराटे, मानसिंग फराटे आणि अनिकेत आण्णासो फराटे यांच्या ऊसाचेही नुकसान झाले. अवघ्या काही वेळात तोडणीसाठी तयार असलेला सुमारे साडेनऊ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

या आगीत सुमारे एक हजार फूट लांबीची पाइपलाइन आणि ठिबक सिंचन संचही जळाला. त्यामुळे पिकाच्या नुकसानीबरोबरच सिंचन व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्याचा वेग आणि आगीची तीव्रता यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

ऊस लागवडीसाठी केलेला खर्च वाया गेल्याने बाधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. संबंधित विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »