ऊसदरासाठी स्वाभिमानी आक्रमक; ऊस वाहतुकीचे ४० ट्रॅक्टर रोखले

ईश्वरपूर : उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा तालुक्यात ऊस वाहतूक रोखली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे सुमारे ४० ट्रॅक्टर अडवून कार्यकर्त्यांनी सहा ते सात बैलगाड्यांच्या टायरमधील हवा सोडली. ऊसदराचा निर्णय झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला.
चालू गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाचा दर निश्चित करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष करून गळीत हंगाम सुरू ठेवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर कृष्णा नदीवरील बहे पुलाच्या परिसरात कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली.
यंदा देशात साखरेची टंचाई असून साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कमी पर्जन्यमानामुळे ऊस उत्पादनही घटू शकते. त्यामुळे साखरेला मिळणाऱ्या चांगल्या दराचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका संघटनेचे नेते भगत जाधव यांनी मांडली. प्रतिटन ५,५०० रुपये पहिल्या उचलीचा निर्णय होईपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
साखरेला बाजारात चांगला दर मिळत असतानाही ऊस उत्पादकांना योग्य दर देण्याबाबत कारखानदार ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप संघटनेने केला. यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या आंदोलनात भगत जाधव, संतोष शेंळके, प्रदीप नांगरे, संजय पाटील, शहाजी पाटील, दत्तात्रेय जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.






