उसाला आग लावल्याप्रकरणी आरोपीला १५ दिवसांची शिक्षा

लातूर : धनसरगाव येथील ऊसाच्या शेताला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी आरोपी बालासाहेब विठ्ठल शिंदे याला रेणापूर न्यायालयाने १५ दिवसांचा साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने ९ ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला.
या प्रकरणातील फिर्यादी ज्ञानोबा संभाजी भिसे हे धनसरगाव (ता. रेणापूर) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या शेतातील ऊस पिकाजवळील सामाईक बांधावरील गवत आरोपीने जाळल्याने आग ऊसाच्या शेतात पसरल्याची तक्रार करण्यात आली होती. या आगीत सुमारे १५ गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाला. ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचेही नुकसान झाले. एकूण २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे ॲड. विशाल मुरळीकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १५ दिवसांचा साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद आहे. तसेच दंडाची रक्कम साक्षीदार क्रमांक तीन अर्चना यांना देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.






