साखरेच्या साठ्याचा हिशेब जाहीर करा, अन्यथा आंदोलन

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. साखरेच्या उपलब्ध साठ्याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी आणि तब्बल ४८ लाख टन साखरेचा हिशेब द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
देशातील साखर उत्पादन, उपलब्ध साठा आणि बाजारातील दरवाढ याबाबत केंद्र सरकारकडून सातत्याने वेगवेगळी माहिती दिली जात असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारकडे साखरेचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असताना, बाजारात दरवाढ होत असल्याने या परिस्थितीबाबत पारदर्शक माहिती देणे आवश्यक असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने साखरेच्या उत्पादनाचा, उपलब्ध साठ्याचा आणि विविध योजनांमधील वापराचा सविस्तर हिशेब जाहीर करावा. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या प्रश्नावर स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून साखर उद्योगासंदर्भातील निर्णय घेतले नाहीत आणि साखरेच्या साठ्याचा स्पष्ट हिशेब दिला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे. साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच ऊस उत्पादक शेतकरीही चिंतेत असल्याने केंद्राने तातडीने परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






