डॉ. सुरेशराव पवार यांनी सांगितले एकरी शंभर टनांचे गुपित

‘थोडेसे बदला आणि एकरी शंभर टन शाश्वत उत्पादन मिळवा’
काष्टी : सहकारी महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने काष्टी (जि. नगर) येथे नुकताच ऊस उत्पादक शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी नामवंत ऊस संशोधक डॉ. सुरेशराव पवार यांनी एकरी शंभर टन शाश्वत ऊस उत्पादनाचे गुपित शेतकऱ्यांसमोर सादर केले.
फक्त एकदा शंभर टन ऊस उत्पादन करून भागणार नाही. त्यात वर्षोनुवर्षे सातत्य असायला हवेत, तरच त्याला शंभर टनी उत्पादक शेतकरी म्हणता येईल. शिवाय एकरी शंभर टन उत्पादन घेण्यासाठी किती खर्च केला हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी विविध उदाहरणांसह समाजवून सांगितले.
डॉ. पवार हे पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील निवृत्त संशोधक आहेत. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या विविध शंका-कुशंकाचे समर्पक उत्तरांनी समाधान केले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन राकेश पाचपुते, व्हाईस चेअरमन शिवाजी शहाजी भोसले, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक एस. बी. टिळेकर, शेतकी अधिकारी एस. बी. शेंडगे, ऊस विकास अधिकारी डी. एस. रोडे आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन कैलास तात्या पाचपुते होते. ‘थोडेसे बदला आणि एकरी शंभर टन शाश्वत उत्पादन मिळवा’ हा परिसंवादाचा विषय होता.