भीषण आगीत चार एकर ऊस जळून खाक; लाखोंचे नुकसान

जत : करजगी (ता. जत) येथे अचानक लागलेल्या भीषण आगीत शेतकरी गंगप्पा मल्लाप्पा गंगनशेट्टी यांच्या शेतातील सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाला. या दुर्घटनेत ऊस पिकासह ठिबक सिंचनाच्या नळ्या, पाइप आणि इतर साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाअभावी ऊस पीक वाचविण्यासाठी गंगनशेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. पाण्याची कमतरता असल्याने टँकरद्वारे शेताला नियमित पाणीपुरवठा करण्यात येत होता. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा आणि ऊस पिकाला आवश्यकतेनुसार पाणी मिळावे, यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्थाही उभारण्यात आली होती.
अनेक अडचणींवर मात करून त्यांनी ऊस पीक जोपासले होते. मात्र, अचानक आग लागल्यामुळे काही वेळातच चार एकरांतील ऊस जळून खाक झाला. आगीची तीव्रता अधिक असल्याने ऊस पिकाबरोबरच शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या, पाइप आणि सिंचनासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही जळाले. त्यामुळे पिकाच्या नुकसानीबरोबरच सिंचन यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे गंगनशेट्टी कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. संबंधित प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीचा तातडीने पंचनामा करावा आणि शेतकरी गंगप्पा मल्लाप्पा गंगनशेट्टी यांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, ऊस पिकाला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणाचा संबंधित यंत्रणेकडून तपास करण्यात येत आहे.






