साखरेच्या साठ्यावर मर्यादा; दरवाढ रोखण्याचा निर्णय

पुणे : देशातील साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून साखर डीलर्सना ३० दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाही. तसेच, कोणत्याही व्यापाऱ्याला ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखर साठवण्यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बाजारातील कृत्रिम टंचाई कमी होऊन ग्राहकांना स्थिर दरात साखर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारच्या मते, साखरेच्या किमतीत होणारी अनियमित वाढ ही पुरवठा- मागणीपेक्षा साठेबाजी आणि कृत्रिम टंचाईमुळे होते. त्यामुळे बाजारात पारदर्शकता आणि नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ही साठा मर्यादा लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे साखर बाजार अधिक स्थिर होण्याची शक्यता असून, ग्राहकांना याचा थेट फायदा होणार आहे.






