महांकाली कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर

कवठेमहांकाळ : महांकाळी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला असून, या प्रक्रियेला सप्टेंबर महिन्यात वेग येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी टप्प्याटप्प्याने कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार, २९ ऑगस्ट रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होऊन वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. १४ सप्टेंबर रोजी गरज भासल्यास मतदान प्रक्रिया पार पडणार असून, १७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आवश्यक असल्यास १८ सप्टेंबर रोजी नव्या संचालक मंडळाची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांचा अंतिम निकाल २३ सप्टेंबरपर्यंत जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीत एकूण १७ संचालकांची निवड होणार आहे. त्यामध्ये १३ सर्वसाधारण, २ अनुसूचित जाती-जमाती, १ महिला आणि १ इतर मागासवर्गीय प्रतिनिधींचा समावेश आहे. महिला व वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी विशेष राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.
मतदारांमध्ये महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासदांचा समावेश असून, सुमारे १४ हजारांहून अधिक सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकतेने पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






