रोहित पवारांची विरोधकांना साथ; स्वपक्षीय आ. पाटलांचा आरोप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमच्याच पक्षाचे आ. रोहित पवार यांनी विरोधकांना साथ दिली, असा गंभीर आरोप आ. नारायणआबा पाटील यांनी केला आहे. श्री आदिनाथ कारखाना निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्याच दोन आमदारांत ‘निवडणुकीचा दुसरा’ अंक सुरू होण्याची शक्यता आहे.

आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार शिंदेंच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. शिंदेंचा उघडपणे प्रचार केला, असे आ. पाटील यांनी म्हटले आहे.

आ. पाटील म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा उघडपणे प्रचार केला. माझ्या पक्षाचे आमदार असूनही त्यांनी मला मदत केली नाही. कारण आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला चालवण्यास देण्यासाठी मी विरोध केला होता, त्यामुळे रोहित पवार यांची माझ्यावर नाराजी होती.

रोहित पवार यांचा करमाळा तालुक्यातील कार्यकर्ता आणि बारामती ॲग्राचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी संजय शिंदे यांचा सक्रियपणे प्रचार केला. आगामी काळात रोहित पवारांची मदत घ्यायची की नाही, यावर लवकरच निर्णय घेऊ. आदिनाथ कारखाना निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोणताही सल्ला दिला नव्हता. आदिनाथ कारखाना निवडणुकीतील रोहित पवारांची भूमिका आम्हाला चुकीची वाटते. त्यांना काय वाटतंय, हे मी सांगू शकत नाही, असेही आमदार पाटील म्हणाले.

आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आमचा विजय झाला आहे, त्यामुळे मी रोहित पवार यांची पक्षाकडे तक्रार करणार नाही. आम्ही अशा गोष्टीकडे अजिबात लक्ष देणार नाही,  असा खुलासाही नारायण पाटील यांनी केला आहे.

हा कारखाना पूर्वी रोहित पवार यांनी राज्य सहकारी बॅंकेकडून चालविण्यासाठी घेतला होता. त्यावेळी आदिनाथ कारखान्यावर बागल गटाची सत्ता होती. पण नारायण पाटील यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’ला चालविण्यासाठी देण्यास विरोध दर्शविला होता. पुढे, कारखान्यावर प्रशासक आला आणि पुढे काखान्याची निवडणूक जाहीर झाली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »