मलप्रभा शुगर्सचे अध्यक्ष बागवान यांच्याविरुद्ध अविश्वास

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांच्याविरुद्ध संचालकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. अविश्वास ठरावावर मतदान झाले असले, तरी बागवान यांनी याला उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविल्याने येत्या १९ एप्रिल रोजी याबाबत निर्णय होणार आहे.

Laxmi Aralikatti
Laxmi Aralikatti, Vice Chairman

यावळी कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मी अरळीकट्टी, संचालक जोतिबा हैबत्ती, मंजुनाथ पाटील, सिद्धाप्पा दोरपनावर, बसवराज भेंडीगिरी, बसवराज पुंडी, मीनाक्षी नेलगळी, सावंत किरबनवर, लक्ष्मण यम्मी, अशोक भेंडीगिरी, संजीव हुबळेपणावर, शंकरगौडा पाटील यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. निवडणूक अधिकारी म्हणून विनायक लक्षाणी, पी. पी. दंडावती यांनी काम पाहिले.

या कारखान्याच्या एकूण १५ संचालकांपैकी एका संचालकाने राजीनामा दिला असून एक जागा रिक्त आहे. उर्वरित १४ संचालकांपैकी १२ जणांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.
कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान आणि संचालक भरतेश शेबन्नावर अविश्वास ठरावाच्या मतदानापासून दूर राहिले. अविश्वास ठरावाच्या मतदानानंतर आपली भूमिका मांडताना संचालक सावंत किरबनवर यांनी, बागवान यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, कारखान्यासाठी परिश्रम घेऊन कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू, असे आश्वासन देऊन बागवान यांनी कारखान्याची सूत्रे हाती घेतली होती. आता ते आपले हे आश्वासन विसरले आहेत. कारखान्याबाबत त्यांना कोणतीही आस्था नाही. दोन महिन्यांपासून ते कारखान्याकडे फिरकले नाहीत. शेतकऱ्यांची ऊस बिले देण्याबाबत लक्ष दिले नाही. त्यामुळे सर्व संचालकांनी अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.

अविश्वास ठरावाविरुध्द कारखान्याचे अध्यक्ष नासीर बागवान यांनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी गुरुवारी गुप्त मतदान घेतले आहे. १९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाचा अंतिम आदेश आल्यानंतर विश्वास ठरावाचा निकाल जाहीर होणार आहे, असे निवडणूक अधिकारी विनायक लक्षाणी यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »