१५ ऑक्टोबरपासून ऊस गाळपास ७ शेतकरी संघटनांचा विरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर आयुक्त संजय कोलते यांना निवेदन; ८ ऑक्टोबरला साखर आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चाचा इशारा

पुणे | शुगरटुडे

राज्याचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू केल्यास त्याचे अनेक तोटे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांनाही होणार आहेत, याकडे लक्ष वेधत, सात शेतकरी संघटनांनी पुणे येथे साखर आयुक्तांना निवेदन देऊन, कारखाने आधी सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास ८ ऑक्टोबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

शिवसेना शेतकरी सेना, जय शिवराय किसान संघटना, शेतकरी-शेतमजूर संघटना, किसान मोर्चा, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आप आदी संघटनांच्या वतीने साखर आयुक्त संजय कोलते यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी झालेल्या चर्चेत श्यामसुंदर जायगुडे, रविंद्र मोरे, रामदास दोरगे, संभाजीराव चौगले, सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, राजेंद्र लोंढे, बाळासाहेब जाधव, गब्बर पाटील, युवराज आडनाईक, उदयकुमार पाटील, शिवाजी आंबेकर, सुनील इंगळे, विलास पाटील, नितीन कांबळे, सुनील पोवार, सुनील कामाण्णा, तानाजी तेली, आण्णासो पाटील, अनिल इंगळे आदींसह विविध संघटनाचे प्रतिनिधींनी भाग घेतला.

या चर्चेवेळी साखर कारखाने १५ ऑक्टोंबर पासून सुरू करण्यास विरोध करण्यात आला याविषयी शेतकरी संघटनांचे म्हणणे होते की, सध्या एल निनोमुळे पाऊस कमी झालेला आहे. शिवाय उसाचा साखर हंगाम हा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च असा असतो. या तीन महिन्यांमध्ये उसाची रिकव्हरी जादा मिळत असते. १५ऑक्टोबरला कारखाने सुरू केले तर केवळ ९ टक्के उतारा असणारा ऊस गाळावा लागेल. यामुळे शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांचे व सरकारचेही नुकसान होणार आहे. कमी उताऱ्याचा ऊस गाळल्यामुळे कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च वाढणार आहे. शेतकऱ्यांनाही त्यामुळे कमी दर मिळणार आहे. सरकारलाही साखर कमी मिळणार आहे. याचा विचार करून साखर कारखाने १५ नोव्हेंबर नंतर सुरु करण्यात यावे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »