अजिंक्यतारा’त सीबीजी प्रकल्प उभारण्याचा मानस : शिवेंद्रसिंहराजे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : बचत, काटकसर आणि नियोजनाच्या जोरावर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगती साधली आहे. सभासद, शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असून कारखाना शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक व सांस्कृतिक भवन येथे झाली. सभेत आगामी हंगामाचे नियोजन आणि कारखान्याच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली. सभासदांनी विषयांना एकमताने मंजुरी दिली. यावेळी बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले, तसेच ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ झाला.

कमी कालावधीत अधिक ऊस गाळप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा कारखान्याचा सातत्याने प्रयत्न असल्याचे भोसले म्हणाले.

इथेनॉल निर्मितीबरोबरच कारखान्यात सीबीजी प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे भोसले यांनी सांगितले. या प्रकल्पातून उत्पादन वाढून त्याचा फायदा ऊसदर देण्यासाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सभासदांनी आगामी हंगामात आपला ऊस अजिंक्यतारा कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सभेत विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या आणि कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन रायसिंह बाबर्दे, व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्यासह संचालक, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »