ऊसदर प्रश्नावर राजू शेट्टींची बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा

ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्या; राजू शेट्टी यांची मागणी
कराड : आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे आणि साखरेचा किमान दर प्रतिकिलो ५० रुपये निश्चित करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. यासह साखर उद्योगाशी संबंधित विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी माजी सहकार व पणन मंत्री, तसेच सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना दिले.
शेट्टी यांनी कराड येथील संपर्क कार्यालयात पाटील यांची भेट घेतली. आगामी ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडे मांडण्यात येणाऱ्या मागण्यांची माहिती देऊन आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली.
गळीत हंगाम सुरू करण्यासाठी १५ ऑक्टोबर ही तारीख निश्चित झाली आहे. मात्र, त्या वेळी उपलब्ध उसानुसार गाळपाचे नियोजन करताना साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता शेट्टी यांनी व्यक्त केली. त्याचा परिणाम शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांवरही होऊ शकतो. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा विक्री दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली. इथेनॉल उत्पादनाबाबतच्या निर्णयांमुळे कारखान्यांच्या इथेनॉल प्रकल्पांवरील कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा भार वाढण्याची शक्यता असल्याने वर्षभरासाठी व्याज सवलत द्यावी आणि कर्जाच्या हप्त्यांना मुदतवाढ मिळावी, अशी योजना जाहीर करण्याची विनंती शेट्टी यांनी केली.
साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांच्या हितासाठी या मागण्यांचा केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, असे शेट्टी यांनी पाटील यांना सांगितले. भेटीदरम्यान पाटील यांनी शेट्टी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.






