करपलेल्या उसाची शरद पवारांकडून पाहणी

माढा तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी
मोडनिंब : चारा छावण्या सुरू करण्याऐवजी पशुपालकांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली. माढा तालुक्यातील तुळशी येथे पाण्याअभावी करपलेल्या उसाच्या पिकाची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
‘गाव विकणे आहे’ असा फलक लावून आंदोलन केल्यामुळे तुळशी गाव राज्यभर चर्चेत आले होते. पवार यांनी रविवारी गावातील शेतकरी सखाराम चव्हाण यांच्या शेताला भेट देऊन करपलेल्या उसाची पाहणी केली. यावेळी त्यांनी चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे पवार यांनी सांगितले. पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करावे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन करत शरद पवार यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.






