पंधरा दिवसांत बोलणी करा, अन्यथा कारखान्यांची धुराडी बंद पाडू : सुरेश धस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वडवणी (जि. बीड) : ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि मुकादमांच्या मागण्यांबाबत साखर संघाने तातडीने बोलणी करावीत. पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास साखर कारखान्यांवर जाऊन धुराडी बंद पाडू आणि संप पुकारू, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला.

वडवणी येथे गुरुवारी आयोजित ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार व मुकादमांच्या मेळाव्यात ते बोलत होते. परिसरातील कामगार, वाहतूकदार आणि मुकादम मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागण्यांवर निर्णय न झाल्यास पंधरा दिवसांनी आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका धस यांनी मांडली.

तोडणी-वाहतुकीच्या दरवाढीसह आर्थिक संरक्षणाची मागणी

मेळाव्यात ऊसतोडणी आणि ऊस वाहतुकीच्या दरात शंभर टक्के, तर मुकादमांच्या कमिशनमध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. कामगारांच्या सुरक्षिततेसह अपघात आणि मृत्यूच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याच्या मागण्याही मांडण्यात आल्या.

कामगाराच्या मृत्यू झाल्यास संबंधित मुकादमाने वाहन खरेदीसाठी घेतलेली उचल पूर्णपणे माफ करावी आणि मुकादमाच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ऊसतोडणी कामगार आणि वाहनचालकांना अपघात झाल्यास १० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे, अशी मागणीही धस यांनी केली.

गुन्हे दाखल करण्याच्या पद्धतीवर आक्षेप

कामगार आणि मुकादमांवर दाखल होणाऱ्या थेट गुन्ह्यांचा मुद्दाही मेळाव्यात उपस्थित करण्यात आला. ऊस वाहतूकदाराची फसवणूक झाल्यास नोटरीच्या आधारे थेट गुन्हे दाखल केले जात असल्याचे धस यांनी सांगितले. या प्रश्नांवरही तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.

मेळाव्यात सुखदेव सानप, बबन माने, प्रवीण शेट्टी, संजय तिडके आणि बाबाजी मुंडे यांनीही विचार मांडले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »