नॅचरल शुगरकडून सभासदांना लाभांशाची गोड भेट!

सलग चौथ्या वर्षी २५ टक्के लाभांश!
कळंब : तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या सभासदांना त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात २५ टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केली. सलग चौथ्या वर्षी हा लाभांश देण्याची परंपरा कायम राखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्याची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत त्यांनी कारखान्याच्या आर्थिक कामगिरीचा आणि आगामी गाळप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. अहवाल वर्षात कारखान्याला ६४.२३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
मागील हंगामात १०.१० लाख टन उसाचे गाळप
मागील गाळप हंगामात कारखान्याने १०.१० लाख टन उसाचे गाळप केले. ऊसतोडणीला झालेल्या विलंबामुळे नोंदणी केलेल्या क्षेत्रांपैकी सुमारे ४० टक्के ऊस अन्य कारखान्यांकडे गेला असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासद, बिगरसभासद तसेच मागील हंगामात अन्यत्र ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आगामी हंगामासाठी १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सलग चार वर्षे लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवत कारखान्याने सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य दिल्याचे ठोंबरे यांनी नमूद केले.






