पाकिस्तानात ऊस स्पर्धा, सरकार देणार एकरी ३० हजार

फैसलाबाद : उसाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये ऊस पीक स्पर्धा घेण्यात येणार असून, येत्या ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत. तेथील कृषी विभाग एकरी ३० हजार रुपये (भारतीय चलनानुसार रुपये १० हजार) अनुदान देणार आहे.
कृषी (विस्तार) विभागाच्या प्रवक्त्याने सोमवारी येथे सांगितले की, फैसलाबाद, झांग, चिनियोट, टोबा टेक सिंग, सरगोधा, भाकर, मंडी बहाउद्दीन, कसुर, मुझफ्फरगड, लय्या, राजनपूर, बहावलपूर आणि रहीम यार खान या 13 जिल्ह्यांतील उत्पादक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
तसेच या शेतकऱ्यांकडे किमान ५ एकर ते अधिकतम २५ एकर लागवडीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. नव्या वाणांच्या चाचणीसाठी ही स्पर्धा होत आहे.
ऊस पिकाच्या एक एकर प्लॉटसाठी सरकार उत्पादकांना 30,000 रुपये आर्थिक सहाय्य देईल, तर लॉटरी पद्धतीने निवडलेल्या शेतकऱ्यांना विभागाच्या शिफारशींनुसार प्रायोगिक प्लॉटवर ऊस पिकाची लागवड करणे बंधनकारक असेल.
या संदर्भात कृषी अधिकारी (विस्तार) आणि सहाय्यक संचालक कृषी (विस्तार) यांच्या कार्यालयात अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत.