यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा

पुणे : Sugartoday
हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारखान्याच्या पुनरुज्जीवना आड येणारे कायदेशीर अडथळे आता दूर झाले असून, कारखान्याचा पुनरुज्जीवनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
लिक्विडेशन प्रक्रियेतून बाहेर: मुंबई उच्च न्यायालयाने सभासदांनी दाखल केलेली रिट याचिका निकाली काढली असून कारखाना आता अवसायक (लिक्विडेशन) प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर आला आहे. ही माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली आहे.
कर्जाची परतफेड आणि शिल्लक निधी: सुनावणीदरम्यान कारखान्याचे ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. अतुल दामले यांनी न्यायालयाला माहिती दिली की, कारखान्याची मालमत्ता विक्री करून सुरक्षित कर्जदारांचे सर्व दावे पूर्णपणे निकाली काढण्यात आले आहेत. सर्व आर्थिक देणी आणि जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर जो काही शिल्लक निधी राहील, तो कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी वापरला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायालयातील सुनावणीचा तपशील: विकास सदाशिव लवांडे व इतरांनी या संदर्भात रिट याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाणी अपीलीय अधिकार क्षेत्रात न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
- कारखान्याची बाजू: ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. अतुल दामले, ॲड. प्रसाद आव्हाड आणि ॲड. चेतन नागरे यांनी कारखान्याची बाजू समर्थपणे मांडली.
- शासकीय बाजू: राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. आसिफ पटेल आणि सहाय्यक सरकारी वकील एम. पी. ठाकूर यांनी काम पाहिले.
कारखाना सुरू होण्यास मिळणार गती: उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाला आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे. न्यायालयाने शपथवेर केलेले निवेदन ग्राह्य धरल्यामुळे, आता कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे थेऊर आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या असून, कारखाना लवकरच धुराडं पेटवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






