स्वदेशी इंधनात नवा टप्पा; ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेलचे अनावरण

लष्करासाठी गेमचेंजर इंधन; अत्यंत थंड हवामानातही सुरक्षित आणि परिणामकारक
नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे स्वदेशी ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेल भारतात विकसित करण्यात आले असून त्याचे लाँच करण्यात आले आहे. हे विशेष प्रकारचे डिझेल अत्यंत थंड हवामानात, उणे ४२ अंश सेल्सियस तापमानातही गोठत नाही, त्यामुळे लष्करी वाहनांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
सीमावर्ती भागात आणि उंच पर्वतीय प्रदेशात तैनात असलेल्या लष्कराला कठीण हवामानामुळे वाहन चालवण्यात अडचणी येतात. पारंपरिक डिझेल थंडीत घट्ट होऊन इंजिन सुरू करण्यात अडथळे निर्माण होतात. मात्र ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेलमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
या डिझेलची निर्मिती देशातील तेल कंपन्यांनी संयुक्तपणे केली असून, ते पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल आणि देशाची ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत होईल.
विशेष म्हणजे, या डिझेलमुळे इंजिनवर ताण कमी पडतो आणि त्याचे आयुष्य वाढण्यास मदत होते. थंड प्रदेशात वाहन सुरू ठेवण्यासाठी पूर्वी दीर्घकाळ इंजिन चालू ठेवावे लागायचे, पण आता या नव्या इंधनामुळे ती गरज कमी होणार आहे.
लष्करासाठी हे इंधन ‘गेमचेंजर’ ठरणार असून, कठीण परिस्थितीतही कार्यक्षम सेवा देण्यास मदत करणार आहे.






