*रियल अचिवर्स* पुरस्काराबद्दल कृष्णा कारखान्याचे एमडी बाजीराव सुतार यांचा सत्कार

कराड । शुगरटुडे
ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशनतर्फे प्रदान करण्यात आलेला प्रतिष्ठेचा ‘रियल अचिवर्स ऑफ महाराष्ट्र 2026’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांचा कारखान्याच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला.
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश बाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याच्या सभासद बंधू-भगिनींच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
श्री. बाजीराव जी. सुतार यांनी सहकारी साखर उद्योग क्षेत्रात गेली 39 वर्षे सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची, कार्यक्षम व्यवस्थापनाची तसेच आतापर्यंत वसंतदादा, वारणा, इंदापूर, संजीवनी व कृष्णा कारखान्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला आहे.
गतिमान प्रशासन, आर्थिक शिस्त, अचूक निर्णयक्षमता, कारखान्याच्या सर्व घटकांची निगडित सौहार्दपूर्ण संबंध, संस्थेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आणि व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या ध्येय-धोरणांची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे श्री. बाजीराव जी .सुतार यांनी सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती मिळाली असून, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
‘रियल अचीवर्स ऑफ महाराष्ट्र 2026’ हा पुरस्कार श्री. बाजीराव सुतार यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय कार्याचा गौरव असून, हा सन्मान संपूर्ण कृष्णा परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आहे. यापूर्वी त्यांना सहकार भूषण 2013, एक्सलन्स इन मॅनेजमेंट फ्रॉम को-ऑपरेटिव्ह शुगर सेक्टर ( ऑस्कर्स ऑफ द इंडस्ट्रीज)2025, समाजभूषण पुरस्कार 2026, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन ( इंडिया) पुणेचा लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड 2025 अशा विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाची आणि सहकार क्षेत्रातील योगदानाचीही विशेष दखल घेतली गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित सभासद बंधू-भगिनी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी श्री. सुतार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.






