ई-२० : गडकरी यांच्या निवासस्थानासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन

आवडल्यास ही बातमी शेअर करा
पोलीस बंदोबस्तात आंदोलनकर्ते ताब्यात; इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाविरोधात घोषणाबाजी

नागपूर : शुगरटुडे

केंद्र सरकारच्या २० इंधन (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणाविरोधातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला असून, सोमवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. गडकरी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी ई-२० धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, ई-२० इंधन धोरणामुळे वाहनचालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, वाहनांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. या धोरणाचा पुनर्विचार करून ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी गडकरी यांचे मुखवटे परिधान करून निषेध नोंदविला.

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गडकरी यांच्या निवासस्थान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा पुढे सरकू नये म्हणून आंदोलनकर्त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ई-२० इंधन धोरणावरून गेल्या काही दिवसांपासून देशभरात राजकीय चर्चा सुरू आहे. काही विरोधी पक्षांनी या धोरणावर आक्षेप घेत ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हा कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करणे, प्रदूषणात घट करणे आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने राबविला जात असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.

SugarToday विश्लेषण

ई-२० इंधनावरील वाद आता तांत्रिक किंवा पर्यावरणीय मुद्द्यापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो राजकीय स्वरूपही धारण करत आहे. मात्र, या चर्चेच्या केंद्रस्थानी ऊस उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी, इथेनॉल उद्योगातील गुंतवणूक आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावरील सार्वजनिक चर्चेत सर्व संबंधित घटकांचा समतोल विचार होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »