सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; स्वतंत्र पोस्टिंगवरून नाराजी

पुनर्रचनेनंतर अनेक अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, पणन विभागातील बदलांमुळे चर्चेला उधाण
पुणे : सहकार विभागातील सहाय्यक निबंधक पदावरील काही अधिकाऱ्यांच्या अलीकडील बदल्या आणि स्वतंत्र पोस्टिंगच्या निर्णयामुळे विभागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पणन विभागातील काही अधिकाऱ्यांना सहकार खात्यात हलविण्यात आल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नवीन बदल्यांनुसार, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ कामापेक्षा वेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढल्याचे दिसून येत आहे. सहकार व पाणन विभागातील कामकाज भिन्न स्वरूपाचे असल्याने या बदल्यांमुळे कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सहकार खात्यातील अंतर्गत गटबाजी आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेवरही या बदल्यांचा परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत योग्य पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
सरकारकडून या बदल्यांचे कारण प्रशासनिक गरज असल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात या निर्णयामुळे विभागातील कामकाजावर परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





