इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सवलत

नवी दिल्ली : पर्यायी इंधनांचा वापर वाढवून कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादन व मिश्रित इंधन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना थेट फायदा होणार आहे. सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत ‘ई-१२’, ‘ई-१५’, ‘ई-२०’ आणि ‘ई-३०’ या प्रकारच्या इंधनांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे.

पेट्रोलमध्ये किती प्रमाणात इथेनॉल मिसळले आहे, त्यानुसार इंधनाचा प्रकार निश्चित केला जातो. वाहनांच्या इंजिनसाठी आवश्यक गुणवत्ता मानके पूर्ण करण्यासाठी इथेनॉल आणि पेट्रोलचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केले जाते.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनाला चालना मिळण्याबरोबरच साखर उद्योग, ऊस उत्पादक शेतकरी आणि पर्यावरणपूरक इंधन क्षेत्रालाही लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच देशातील इंधन आयात खर्च कमी करण्यासही मदत होऊ शकते.






