ढोकीत ऊसदरावरून शेतकरी–कारखानदार आमनेसामने

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊस वाहतूक रोखल्यानंतर लातूर–बार्शी मार्गावर रास्ता रोको

ढोकी : उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर देण्याच्या मागणीवरून ढोकी येथे बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) रात्री शेतकरी आणि कारखानदारांमध्ये वाद झाला. शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने अडवल्यानंतर दोन्ही बाजू आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

ऊसदराच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री शेतकऱ्यांनी ढोकीतील छत्रपती संभाजी महाराज चौकात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक रोखले.

यावेळी एस. पी. शुगरचे चेअरमन सुरेश पाटील घटनास्थळी आले. पाटील यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच, शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, वाहने अडविणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सुरेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी लातूर–बार्शी मार्गावर रास्ता रोको केला. दुसरीकडे, पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ढोकी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. ऊसदराच्या प्रश्नातून सुरू झालेला वाद रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »