देवळाली प्रवरात शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक फटका; तातडीच्या मदतीची मागणी

राहुरी : पाणीटंचाईमुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे उसाला आग लागून चार एकर क्षेत्रातील पीक जळून खाक झाले. राहुल हरिभाऊ महांकाळ यांच्या शेतात शनिवारी, ३ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.

विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने आग लागल्याचे वृत्त आहे.महांकाळ यांच्या शेतातून गेलेल्या वीजवाहिनीत अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यातून पडलेल्या ठिणग्यांमुळे उसाने पेट घेतला.

पाणीटंचाईमुळे ऊस वाळलेला असल्याने आग वेगाने पसरली आणि काही वेळातच तिने रौद्र रूप धारण केले.आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, वाळलेल्या पिकामुळे आगीचा वेग वाढत गेला. शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत चार एकरांतील ऊस जळून खाक झाला.दुष्काळी परिस्थितीत उत्पादनखर्च भागविणे कठीण झाले असतानाच या घटनेमुळे महांकाळ कुटुंबासमोर आणखी आर्थिक संकट उभे राहिले आहे. हाताशी आलेले पीक आगीत नष्ट झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांतही हळहळ व्यक्त होत आहे.महावितरण आणि महसूल विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »