साखर महासंघ, इस्माच्या पुढाकारातून शुगरकेन सेंटर ऑफ एक्सलन्स

पुणे । शुगरटुडे
तामिळनाडूतील कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक ऊस उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी एकूण १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शास्त्रज्ञांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (NFCSF) आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) यांच्या संयुक्त सहभागातून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये साखर उद्योगाकडून ४५ कोटी रुपये, तर केंद्र शासनाकडून ५५ कोटी रुपये देण्यात येणार असून, संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
संशोधनाला नवे बळ
या उत्कृष्टता केंद्रामध्ये कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे, रोगप्रतिकारक क्षमता असलेले तसेच बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारे ऊस वाण विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर इथेनॉल, जैव-सीएनजी, हरित ऊर्जा, ऊस उत्पादनक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक शेती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही विशेष संशोधन करण्यात येणार आहे.
कोयंबतूरची संशोधन परंपरा
कोयंबतूर येथील आयसीएआर-शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट ही देशातील सर्वात जुनी ऊस संशोधन संस्था मानली जाते. १९१२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या शतकभरात देशाला अनेक उच्च उत्पादक आणि रोगप्रतिकारक ऊस वाण उपलब्ध करून दिले आहेत. नव्या उत्कृष्टता केंद्रामुळे भारतीय ऊस संशोधनाला जागतिक दर्जाची दिशा मिळेल, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
लाखो शेतकऱ्यांना लाभ
देशातील साखर उद्योगाशी सहा कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी, लाखो कामगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जोडलेली आहे. त्यामुळे या संशोधनाचा थेट फायदा ऊस उत्पादकांना, साखर कारखान्यांना तसेच जैवइंधन क्षेत्राला होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस शेतीचे प्रयोग सुरू असून, अशा तंत्रज्ञानाचा देशभर विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली.





