लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; ऊसतोडणी मुकादमाविरुद्ध गुन्हा

गंगाखेड (जि. परभणी) : ऊसतोडणीच्या कामादरम्यान ओळख झालेल्या २५ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून एका मुकादमाविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सातपुते (ता. अंबाजोगाई) याच्याविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला विधवा असून ती आपल्या दोन मुलांसह राहते. सन २०२५ मध्ये ऊसतोडणीच्या कामासाठी गेल्यानंतर तिची मुकादम सातपुते याच्याशी ओळख झाली. त्याने तिच्याकडून दीड लाख रुपये उचल घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
कारखान्यातील ऊसतोडणीचे काम संपल्यानंतर सातपुते याने महिलेला तिच्या पतीच्या मुलांना त्रास होत असल्याचे सांगून अन्य ठिकाणी भाड्याने खोली घेऊन काम करण्यास सांगितले. त्यानुसार महिला मुलांसह भाड्याच्या खोलीत राहू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी आणि खाण्यापिण्यासाठी पैसे उपलब्ध करून देण्याचे तसेच लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याने अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
त्यानंतर सातपुते याने महिलेला धमकावल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे गंगाखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कामदेव सानप करीत आहेत.






