कारखाने सुरू केल्यास रास्ता रोकोचा इशारा; राजू शेट्टी आक्रमक
सातारा : शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वी कारखाने सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकही साखर कारखाना नोव्हेंबरपूर्वी सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
इंदोली (ता. कराड) येथे ऊसदरासाठी आयोजित ‘एल्गार सभेत’ ते बोलत होते. कारखाने वेळेपूर्वी सुरू केल्यास रस्त्यावर गाड्या अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली. कारखानदार आणि शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
सभेला जिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, सरपंच बाबुराव माने, युवक प्रदेशाध्यक्ष सुमेध जाधव, संजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य राजू शेलके, बाळासाहेब निकम यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कारखाने सुरू झाल्यानंतर ऊस तोडणीला सुरुवात होईल. मात्र, उसाला योग्य दर मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे उपस्थितांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.






