सोळंके कारखान्याच्या बगॅसला आग

माजलगाव : तेलावर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस व इतर साहित्याला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत कारखान्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागला.
तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस कनव्हेअरला शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. कांही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण करीत आग मोठ्या प्रमाणात फैलावली. यात मोठ्या प्रमाणात बगॅस जळाला असुन तेथे असलेले इतर साहित्यासही आग लागुन ते जळून खाक झाले. ही आग लागल्याचे लक्षात येताच तेथे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कारखाना कार्यालयास कळवले असता तेथून तात्काळ कारखान्याच्या अग्नीशमन बंबास पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग वाढतच असल्याने कारखाना कार्यालयाने माजलगाव, वडवणी, धारूर येथील नगर परिषदच्या अग्नीशमन बंबास ही पाचारण केले. या तिन्ही ठिकाणाहून कांही वेळात कारखाना येथे अग्नीशमन बंब आले. त्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. चार अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने दोन तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले. कारखान्याच्या प्राथमिक अंदाजानुसार १०० मे.ट. बगॅस, रबर बेल्ट सी सी ४, बी सी ३, बी सी-८ व ट्रॅश कटर, इलेक्ट्रिक मोटार, केबल, अॅडलर, ड्रम आदी साहित्य जळाले असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले.