‘कुंभी-कासारीच्या ऊसपुरवठादार सभासदांना दहा रुपयांत साखर’

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कसबा ठाणे : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या सभासदांना सवलतीची साखर दहा रुपये दराने देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. ऊसपुरवठा न करणाऱ्या सभासदांसाठी साखरेचा दर २५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या ६५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

सभेला उपाध्यक्ष सरदार पाटील, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने आणि सभासद उपस्थित होते. गतवर्षी कारखान्याने ४ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप केले. १२.५५ टक्के साखर उताऱ्यासह ६ लाख १३ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता प्रतिटन ३ हजार ९६० रुपये ऊसदर दिल्याची माहिती नरके यांनी दिली.

सभेत कल्लाप्पा खाडे यांनी मागील वर्षाच्या तुलनेत कारखान्याच्या कर्जात १२५ कोटी रुपयांची वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर नरके यांनी उसाचे गाळप घटल्यामुळे एफआरपी वाढली असून, साखरेला अपेक्षित दर मिळाला नसल्याचे स्पष्ट केले.

शेतात तसेच वाहनांवर ऊस अनेक दिवस पडून राहत असल्याचा मुद्दाही सभासदांनी मांडला. तोडणी-वाहतूकदारांकडून प्रतिटन शंभर रुपये घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, तोडणी-वाहतूक नियोजन आणि ऊसपुरवठा न करणाऱ्या सभासदांच्या शेअर्सबाबतही चर्चा झाली.

नामदेव पाटील यांनी प्रेसमड चोरीप्रकरणी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप केला. सवलतीच्या साखरेची परस्पर विक्री होत असल्याचा आरोपही त्यांनी मांडला. टी. एल. पाटील यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरू करण्याची आणि शासनाकडे प्रतिटन ५०० रुपये अनुदानाची मागणी करण्याची सूचना केली.

पाळीपत्रकानुसार ऊसतोडणीचे नियोजन करावे आणि शेतकऱ्यांनी ऊस इतरत्र पाठवू नये, असे आवाहन सभेत करण्यात आले. विविध विषयांवरील चर्चेत अनेक सभासदांनी सहभाग घेतला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »