“वाळूचे कण” : जीवनानुभवांची समृद्ध मांडणी

ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांचा सातपूर (नाशिक) येथील ज्ञानसिंधू प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अतिशय देखणा ‘वाळूचे कण’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. यापूर्वी ‘अंतरीचे बोल’ हा त्यांचा पहिला आशयसंपन्न काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. शेतकरी बांधवांसह ऊसतोड मजुरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या साखर उद्योगाला सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या कवी आणि साखर तंत्रज्ञ असणाऱ्या इंजि.वाळू रघुनाथ आहेर यांनी तांत्रिक कौशल्यासह साहित्याच्या क्षेत्रातही आपलं कसब दाखवलं आहे.
या संग्रहात विविध आशयाच्या ७६ कविता आहेत. ‘नाशिक कवी’ या अग्रगण्य संस्थेचे अध्यक्ष इंजि.बाळासाहेब मगर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. संग्रहातील कवितांमध्ये निसर्ग, स्त्रीजाणिवा, गणगोत, साखर उद्योग, कृषिजीवन, भक्तिमार्ग, देवदेवता, काव्यनिर्मिती, सणसमारंभ असे विषयवैविध्य आहे, आशयाची विविधता आहे, सामाजिक जाणीव आहे आणि विशेष म्हणजे समाजजीवनाला संदेश देण्याची भूमिका कवीची आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर-
सागरासम विचार करा/प्राणिमात्रांवर दया करा,
आधुनिकतेची कास धरा/जगाला प्रेम अर्पण करा!
या कवितेचे देता येईल. साखरउद्योग आणि लेखनाच्या आपल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग करून, जनसामान्यांच्या सुख-दुःखाचा आणि श्रमसाफल्याचा खजिना घेऊन साकार झालेल्या या काव्यसंग्रहाच्या पानोपानी वाचकांना नावीन्यपूर्ण शब्दकळा आणि जीवनानुभवांची समृद्ध मांडणी अनुभवण्यास मिळेल.
संसार आहे सुंदर धडा/जगण्याचा जणू पाढातो वाचणे हाच नियम/मिळेल संसारसुख कायम!
अशी सुखी संसाराची गोष्ट ते सांगतात. सुप्रसिद्ध कवी रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर यांनी मलपृष्ठावर लिहिलेल्या मोजक्या शब्दांनी कवी वाळू आहेर यांच्या विचारांना बळकटी येते. श्री चित्रालय यांनी साकारलेले अतिशय देखणे मुखपृष्ठ आणि प्रकाशक तान्हाजी खोडे यांनी संग्रहासाठी घेतलेले कष्ट वाचकांच्या नजरेत भरतात. गणगोत, मन पाखरू, ढोलकी, तोरण, पंचारती, हिमालय, मुखी असे रामनाम, जन्म कवितेचा, कवडसा, विरहगीत, तुमचा भ्रम, हिरवा चुडा, आधुनिक भक्तराज, मैत्री, पाळणा… अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी सजलेला हा काव्यसंग्रह वाचकांनी निश्चित अनुभवावा; असा झालेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक वाळू रघुनाथ आहेर यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी लाख-लाख शुभेच्छा!
– डॉक्टर सौ.रोहिणी अजय कापसे, नाशिक






