मराठवाड्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी ऊस खरेदीचा प्रस्ताव

दुष्काळी भागात उसाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करा : आ. बबनराव लोणीकर
जालना : जिल्ह्यातील पावसाची तूट आणि वाढती चाराटंचाई लक्षात घेता, साखर कारखान्यांकडे गाळपासाठी जाणारा ऊस शासनाने थेट खरेदी करून जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरावा, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. या मागणीसह दुष्काळी भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी विविध उपाययोजना सुचवणारे निवेदन त्यांनी महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारणासाठी गठित राज्य मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.
मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. चारा उपलब्ध नसल्याने पशुपालकांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने नियोजन करावे, असे लोणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
कृषी विभागामार्फत मका आणि ज्वारीसारख्या जलद वाढणाऱ्या चारा पिकांच्या बियाण्यांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप करावे. तसेच चारा छावण्यांमध्ये जनावरांसाठी पुरेसा चारा, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी नियोजन करावे आणि शेतीसाठी दिवसाला आठ ते दहा तास अखंड वीजपुरवठा द्यावा, असे त्यांनी सुचवले.
परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील लोअर दुधना प्रकल्प परिसरात गाळ साचून तयार झालेली सुमारे तीन हजार हेक्टर जमीन चारा लागवडीसाठी उपलब्ध करून द्यावी, असाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. स्थानिक पातळीवर चारा आणि पाण्याचे नियोजन करून पशुधनाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज लोणीकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.






